लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्यावर्षी ९ मार्चला पुण्यात पहिल्यांदा कोरोना विषाणू आढळला. तेव्हापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढउतार झाला. मात्र दोन दिवसांपुर्वीच थेट सहा महिन्यांच्या खंडानंतर पहिल्यांदाच पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे प्रशासन काळजी व्यक्त करत आहे. मात्र यातील बहुतांशी रुग्ण लक्षणेविरहित आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर होणार नसला तरी निर्बंध वाढू शकतात, असे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
गुरुवारी (दि. १८) महापौर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील पाचही विभागांमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक हजार ५५० खाटांची क्षमता असलेली ही केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, त्याची तीव्रता कमी आहे. नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. गृह विलगिकरणात राहून उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. आवश्यकता वाटल्यास खाजगी हॉस्पिटलमधील ८० टक्के खाटा पुन्हा ताब्यात घेण्यात येतील असे मोहोळ यांनी सांगितले़
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असली तरी गंभीर रूग्ण संख्या कमी असून, आजमितीला केवळ ऑक्सिजन खाटांची मागणी होत आहे. यामुळे शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये २०० ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असून याचे सर्व नियोजन पुणे महापालिकाच करणार असल्याचे मोहोळ म्हणाले.
चौकट
येथे होणार कोविड केंद्रे
रक्षकनगर - २०० खाटा, बाणेर -३०० खाटा, खराडी पठारे स्टेडियम - ३०० खाटा, बनकर शाळा - ३०० खाटा, संत ज्ञानेश्वर सभागृह - ३५० खाटा
चौकट
सार्वजनिक वाहतूकीवर निर्बंध
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र येत्या दोन-तीन दिवसात निर्बंध अधिक कडक करणार असल्याचे सांगितले. पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्याऐवजी बसमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रवास होईल याची काटेकोर अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच उद्याने, जलतरण तलाव, सिनेमागृहे, मॉल यावर अधिक निर्बंध आणले जातील. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केले जाणार आहेत.
चौकट
कोणती लस घेण्यावरूनच गोंधळ
लसीकरणाबाबत कोणताही गोंधळ नसून, केवळ नागरिकांमध्ये कोणती लस घ्यावी याबाबत संभ्रम आहे. मात्र कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड यावरून काळजी करण्याचे कारण नाही. दोन्ही लसी प्रमाणित आणि भारतातच तयार झालेल्या आहेत. ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आलेला आहे, तोच दुसरा डोस संबंधित व्यक्तीला दिला जाईल याची काळजी महापालिका घेईल. नागरिकांनी मनात किंतु बाळगू नये असे आवाहन महापौरांनी केले.