राजगुरूनगर (पुणे) : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत आला तरीदेखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वस्तरातून चिंता व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी तशीच पडून आहे. पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, चिंचबाईवाडी, वरूडे, कनेरसर, दावडी, निमगाव आदी अनेक गावांमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू होऊन सुमारे महिना उलटला आहे. जेमतेम पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी अद्याप शिल्लक आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांचे बी-बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पेरणीचे दिवसही निघून जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी जुलै महिन्यात शेतशिवारातील ओढे, नाले पावसाच्या पाण्यामुळे खळखळून वाहतात. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ओढे, नाले कोरडेठाक आहेत. पावसाळ्याच्या दिवसात उन्हासारखी स्थिती पाहायला मिळत आहे. ओढे-नाले कोरडेच असल्यामुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत घट होत आहे.
पाऊस लांबल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना चारा टंचाईचे संकट भेडसावणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होतो. यंदा मात्र पाऊसच नसल्याने चारा उगवला नाही आणि उन्हाळ्यात साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे. त्यामुळे पशुपालकही अडचणीत सापडले आहेत. चाऱ्याची मागणी लक्षात घेता चाऱ्याचे दरही वाढले आहेत. यावर्षी जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जून महिन्यात पेरणी करता आली नाही. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
पेरणीला उशीर झाल्याने जमिनीत थोडा जरी ओलावा असेल तर शेतकरी पेरणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात भाताचे सरासरी ७७५० हेक्टर क्षेत्रापैकी १० जुलैपर्यंत १५३ हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. सोयाबीनची १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.