- शैलेश काटे
इंदापूर (पुणे) : छ. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे चिंचेचे पुरातन झाड शुक्रवारी दुपारी इंदापूर नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. त्यावर रहिवास करणा-या चित्रबलाक पक्षी व वटवाघळांचा त्या कारवाईत मृत्यू झाला. पक्ष्यांचा मृत्यू व वृक्ष पाडण्याची कारवाई वादाचा व चर्चेचा विषय झालेली आहे.
मालोजीराजे यांच्या गढीवर चिंचेची महाकाय पुरातन वृक्ष आहेत. गढीच्या उत्तरेला साधारणतः दीडशे वर्षांहून अधिक वयाचे चिंचेचे झाड आहे. या सर्व झाडांवर चित्रबलाक या परदेशी पक्षाचा कित्येक शतकांपासूनचा रहिवास आहे. गढीच्या कडेला असणारे चिंचेचे एक झाड काल इंदापूर नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. त्या कारवाईत जेवढे पक्षी उडून गेले तेच वाचले. अन्य पक्षी, त्यांची घरटी, त्यातील अंडी व निद्रिस्त वटवाघळे झाडाच्या ओझ्याखाली चिरडून गतप्राण झाली. जखमी झालेले पक्षी जिवंतपणी नगरपरिषदेने कचरा डेपोच्या कच-यात मातीआड केले.
ही माहिती पक्षीप्रेमी नागरिक व नागरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व वनविभागाशी संलग्न असणा-या रेस्क्यू टीमला समजल्यानंतर त्यांनी रात्री येवून कचरा डेपो धुंडाळला. तेथे सापडलेल्या आठ चित्रबलाकांना त्यांची उपचारासाठी नेले. किरकोळ जखमी असणा-या दोन चित्रबलाकांवर प्रथमोपचार करुन वनविभागाने त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. तर मरण पावलेल्या आठ पक्षांना रीतसर मूठमाती दिली.