लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या अद्यापही आटोक्यात येत नसून, या गावात १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्याच्या घडीला जवळपास १०० गावे ही हॉटस्पॉट यादीत आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या ८८ एवढी होती. मात्र, यात १२ गावांची वाढ झाली आहे. या ठिकाणी रुग्णांना शोधण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम सुरू असली तरी बाधितांची संख्या कमी आणण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णवाढीचा दर हा कमी होत आहे. मात्र, ज्या प्रमाणात ही घट होणे अपेक्षित होते, ती न झाल्याने अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णबाधितांचा वेग हा जास्त आहे. हा दर करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. हॉटस्पाॅट गावात आघाडीवर असलेल्या हवेली तालुक्यात ही संख्या कमी आली आहे. सध्या केवळ ९ गावे तालुक्यात हॉटस्पॉटच्या यादीत आहे. बारामती तालुक्यातही हॉटस्पॉट गावांची संख्याही आटोक्यात आली आहे. मात्र, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक २१ गावे ही हॉटस्पॉट बाधित आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ही आटोक्यात आलेली नाही.
आरोग्य विभागातर्फे गेल्या आठवड्यात १०७ गावे हॉटस्पॉट, तर ३०० गावांत किमान १ रुग्ण असल्याचे जाहीर करण्यात आले होते. येथील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. या गावातील प्रत्येक घरातील बाहेर जाणाऱ्यांची अॅन्टीजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात मोठ्या प्रमाणात लक्षणे नसलेले आढळले होते. त्यांना सामान्य नागरिकांत मिसळण्यापासून रोखण्यात आले. मात्र, अद्यापही रूग्ण आढळत असल्याने चिंतेचे वातावरण अद्याप कायम आहे.
चाैकट
लसीकरण मोहीम संथ गतीनेच
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे क्षमता असूनही लसपुरवठा योग्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण क्षमतेने करता येत नाही. अद्यापही ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण बाकी आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता लसीकरणाचा वेग वाढवणे हेच क्रमप्राप्त ठरणार आहे.
चौकट
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसऱ्या लाटेचा इशारा
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून जिल्ह्यात तिसरी लाट ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता असल्याचा अहवाल प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही लस रोखायची असेल किंवा तिची तीव्रता कमी करायची असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.