पुणे : महंमदवाडी परिसरातील क्लब २४ या पबवर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मध्यरात्री छापा घातला असून, त्यावेळी तेथे तब्बल १०४ तरुण-तरुणी आढळून आले. रात्री ११ नंतर संचारबंदी जारी केली असताना तेथे कोरोनाचे सर्व नियम तोडून तरुण-तरुणी धुमाकूळ घालत असल्याचे आढळून आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरही संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. असे असतानाही क्लब २४ पबमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी जमले असून वीकएंड साजरा करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या क्लब २४ वर छापा घातला. त्यात तब्बल १०४ तरुण-तरुणींना पकडण्यात आले. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यातून कुमक मागविण्यात आली. हा पब एक नगरसेवक चालवत असल्याची माहिती मिळत आहे.