कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील चौकात असलेल्या नाल्यामध्ये कचरा तसेच पाणी तुंबल्यामुळे या परिसतात दुर्गंधी पसरली आहे. हेच पाणी पुढे मळद येथील तलावात जात असल्याने या तलावातही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.कुरकुंभ नाल्यातील वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, या पाण्यामुळे मळद तलावाचेही पाणी दूषित होत आहे. या नाल्यात कचरा साचला आहे. यामुळे येथे पाणी तुंबून राहते. हा कचरा या पाण्यातच कुजतो. यामुळे परिसरात नेहमीच दुर्गंधी असते. हा कचरा मळद तलावातही जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नाल्याची तसेच तलावाच्या सफाईची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अस्वच्छतेत आणखीनच भर पडली आहे. या नाल्यामध्ये काही प्रमाणात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्याचा समावेश आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होते. या तलावातील मासे नष्ट होण्याच्या मार्गावर असून पाण्याचा उपयोग काही प्रमाणात शेतकरी करीत आहेत. मळद तलावात रासायनिक पाण्याचा तवंग येत आहे. या बाबींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ग्रामस्थांवर अन्यायच आहे. त्यामुळे पावसात येणारे पाणी हे फक्त पावसाचेच आहे, हे कळण्यासाठी नालेसफाई महत्त्वाची आहे.
दुर्गंधीने कुरकुंभकर त्रस्त!
By admin | Published: June 15, 2014 4:17 AM