निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील पाचपडाळ (मीरावस्ती) येथे गेली १० ते १२ दिवस धुमाकूळ घालून अनेक पाळीव प्राण्यांचा बळी घेणारा बिबट्या वनविभागाच्या अथक प्रयत्नाने रविवारी रात्री अखेर जेरबंद झाला, अशी माहिती युनूस पटेल व रज्जाक रेहमान पटेल यांनी दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी, की गेली १० ते १२ दिवस पाचपडाळ येथील वाडी -वस्त्यांवर धुमाकूळ घालून अनेक शेळ्या, मेंढ्या व कुत्र्यांना आपले भक्ष्य बनविणाऱ्या बिबट्याने रविवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सलीम अली पटेल यांच्या घराजवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला करून ठार केले. त्याच सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेली सलीम पटेल यांची सुमारे ३ वर्षे वयाची नात बिबट्या मारत असलेल्या शेळीकडे धावली. ही बाब सलीम पटेल यांची पत्नी शमा पटेल यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित धाव घेऊन नातीला उचलले असता समोर असलेल्या बिबट्याने शेळी सोडून शमा पटेल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची साडी फाटली. परंतु नातीला घेऊन त्या सहीसलामत घरात जाण्यात यशस्वी झाल्या.या घटनेबरोबर बिबट्याने पाचपडाळ वस्तीतील सुमारे १० ते १२ दिवसांत स्थानिक शेतकऱ्यांच्या तीन मेंढ्या, दोन शेळ्या व दोन कालवडी ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे व उद्योगपती भास्कर गाडगे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तिथे कोणताही वनकर्मचारी व अधिकारी न आल्याने त्यांनी वनविभागाचे अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून ते त्वरित घटनास्थळी आले. रात्रभर वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याची योग्य त्या ठिकाणी व्यवस्था करून सापळा रचला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पुन्हा सलीम पटेल यांच्या गोठ्यात शिरला व एक कालवड ठार करून घरामागील केळीच्या शेतात पसार झाला. (वार्ताहर)
धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
By admin | Published: June 14, 2016 4:39 AM