सागर शिंदे,
इंदापूर : कोरोनाच्या कालावधीत संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होते. त्यामध्ये जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा व अनेक पालखी सोहळे, नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने रद्द केले. अनेक छोटेमोठे भजनाचे कार्यक्रमही मागील एक वर्षांपासून बंद होते. सध्या अनलॉक झाल्याने नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती ओसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वारकरी भजन, गवळणी म्हणत हरिनामाच्या गजरात हुरडा पार्टी करताना दिसत आहेत.
इंदापूर शहरातील संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात समवेत चालणाऱ्या भजनी मंडळाने प्रथेप्रमाणे यंदाही इंदापूर शहरातून हरिनामाचा गजर गात, थेट करमाळा तालुक्यातील पाथर्डी येथील शिवाजी काळे यांच्या शेतात हरिनामाच्या भजनाची जुगलबंदी खेळत गावरान ज्वारीच्या हुरड्याचा आस्वाद असंख्य वारकऱ्यांनी घेतला. यासाठी वारकरी मंडळी यांना स्वखर्चाने प्राध्यापक कृष्णाजी ताटे हे उपक्रम पार पाडत आहेत.
इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे हे सालाबाद प्रमाणे वारकऱ्यांना हुरडा पार्टी देत असतात. यंदाही या आनंदीमय हुरडा पार्टी असंख्य भजनी वारकऱ्यांना घेऊन करण्यात आली. इंदापूर शहर येथून भजनी मंडळातील सर्व वारकरी "पुंडलिक वर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" हा गजर करून करमाळा तालुक्याकडे प्रस्थान केले. श्री क्षेत्र देवाची रांझणी येथील ओंकारनाथ देवस्थान येथे प्रथेप्रमाणे हरिपाठ व पंचपदी भजन करण्यात आले. तब्बल पन्नास किलोमीटर चे अंतर हरिनामाच्या भजनाने दुमदुमून गेले होते.
पाथुर्डी येथे भजनी मंडळ पोहोचताच, शेतकरी शिवाजी काळे यांनी हरिनामाच्या भक्तिभावात वारकऱ्यांचे स्वागत केले. जुन्या पद्धतीने वारकऱ्यांनी काही क्षणाचा विलंब न लावता शेतामध्ये आखटी ( हुरडा भाजण्यासाठी खड्डा ) खांदण्यास सुरुवात केली. यावेळी हरिपाठातील अभंग गायले जात होते. तर काही वारकरी शेणाच्या गावऱ्या गोळा करीत हुरडा भाजण्याची च्या तयारीला लागले होते. चटणी शेंगदाणे, व इतर चटण्या, गुळ रेवड्या फरसाणा लिंबाचे लोणचे यासोबत फुटाणे, खारी शेंगदाणे हुरड्याच्या पार्टीत मोठी चव आणत होते. अनेक वृद्ध वारकरी केवळ हरिनामाचे प्रेम यासाठी एकमेकांना हाताने गरम गरम हुरडा चोळीत खाण्यासाठी घास भरवत होते.
काय सांगू आता संतांचे उपकार ! मज निरंतर जागवीती ! या अभंगाची धून सुरू होताच हुरडा खाण्यास सुरुवात झाली. वारकऱ्यांचे प्रमुख पांडुरंग ( आबा ) पवार, मानाचे विणेकरी जाधव, आजिनाथ ठोंबरे, राऊत महाराज, सुदाम जौंजाळ, सतीश बाबर, प्रदीप पवार, काशीद गुरुजी, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे, यांच्यासह इंदापूर शहर भजनी मंडळाचे सर्व वारकरी हुरडा पार्टीचा आस्वाद घेत होते. वारकऱ्यांचे स्वागत शेतकरी शिवाजी काळे यांनी केले. तर आभार प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी मानले.
इंदापूर येथील भजनी मंडळाने करमाळा तालुक्यात जाऊन हरिनामाच्या भजनात सोबत हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला