पुणे : मान्सूनच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या दक्षिणपूर्व उपसागरात असानी चक्रीवादळ तयार झाले असून सोमवारी दुपारी ते आणखी तीव्र होणार आहे. या चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार हे पूर्व किनारपट्टी जवळ येऊन ते पुन्हा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे.
असानी चक्रीवादळ गेल्या ६ तासांपासून ताशी १४ किमी वेगाने वायव्यच्या दिशेने सरकत आहे. रविवारी ते चक्रीवादळ कारनिकोबारपासून ५६० किमी, पोर्ट ब्लेअरच्या पश्चिमचेला ४७० किमीवर, तसेच विशाखापट्टणमपासून ८५० किमी आणि पुरीपासून ९३० किमी दूर आहे. हे चक्रीवादळ १० मेपर्यंत किनारपट्टीकडे सरकत पुढे येण्याची शक्यता आहे. १० मे रोजी सायंकाळपर्यंत ते उत्तर आंध्र प्रदेश व ओडिशा किनारपट्टीलगत आल्यानंतर ते किनारपट्टीपासून काहीसे दूर ईशान्य पूर्वेकडे वळण्याची शक्यता आहे.
असानी चक्रीवादळाचे सोमवारी दुपारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यावेळी या चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किमी असण्याची शक्यता आहे. ९ मे रोजी या वाऱ्यांचा वेग ११५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. १० मे रोजी ते पूर्व किनारपट्टीजवळ येईल, त्यानंतर त्याचा वेग कमी होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ११ मे रोजी सकाळी या तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर पुन्हा चक्रीवादळात होईल. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात १२ मेपर्यंत राहणार असून त्यानंतर ते समुद्रातच विरण्याची शक्यता आहे.
असानी चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला असानी हे श्रीलंकेने दिले आहे. असानी या शब्दाचा अर्थ राग असा होतो.