लोणी काळभोर : निवडणूक पार्श्वभूमीवर येथील दोन गटांत भांडण झाले असून यामध्ये लोखंडी गज, लाकडी दांडक्याने यांचा वापर करण्यात आला आहे. दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून एकून साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीत महाराष्ट्र केसरी पैलवान व शिवसेना तालुका प्रमुखासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शुभम काळभोर ( वय २२, रा. बाजारमळा, लोणी काळभोर ) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या परिवर्तन पॅनेलचे पाषाणकर बाग, लोणी काळभोर येथे कार्यालय आहे. १२ जानेवारी रोजी रात्री ११ - ३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यासमवेत राजेश काळभोर, अमोल काळभोर, ऋषीकेश काळभोर, अजित काळभोर, अक्षय कामठे, रोहीत जवळकर हे जेवणखान करून राहुल काळभोर हे पॅनेलचे ऑफिस मध्ये झोपण्यासाठी आले. त्यावेळी विरोधी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, विशाल काळभोर, गुरूदेव काळभोर, सौरभ काळभोर, शुभम काळभोर, निखील काळभोर, वैभव काळभोर, रोहित गिरी, निलेश काळभोर, शुभम क्षीरसागर व सिध्देश्वर क्षीरसागर हे हातात लाकडी गज व लाकडी दांडके घेऊन तेथे आले. व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांनी अविनाश चौधरी यांच्या स्कॉर्पिओचे देखील नुकसान केले. अक्षय कामठे याला डोळयाजवळ व डोक्यात मारून जखमी केले. शुभम व राजेश काळभोर मध्ये गेले असता सौरभ काळभोर, प्रशांत काळभोर व गुरूदेव काळभोर यांनी त्याच्या हातातील गजाने त्यां पाठीत मारहाण करून त्या सर्वानी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करून ते निघुन गेले. या भांडणात शुभम काळभोर यांची पाच तोळे वजनाची सोन्याची साखळी गहाळ झाली आहे.
अष्टविनायक पॅनलचे सौरभ दयानंद काळभोर ( वय २३, रा.बाजारमळा, लोणी काळभोर ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते १२ जानेवारी रोजी रात्री ११ - ३० वाजण्याच्या सुमारास सफारी गाडीतून लोणी काळभोर गावातील पाषाणकर बाग गॅस एजन्सीचे समोरील रोडवर आले त्यावेळी रोहीत जवळकर ( रा.आळंदी म्होताबाची ता हवेली ) व त्याचे सोबत चार अनोळखी मुले होती बाकीचे चार मुले सोरतापवाडी येथील स्कॉर्पिओमध्ये बसले होते तेव्हा सौरभ याने रोहित याला तू इथे काय करतोय असेे विचारले असता तो तु खाली उतर तुला दाखवितो असे म्हणाल्याने सौरभ गाडीतून खाली उतरला असता रोहित व त्याचे सोबत असलेल्या चार मुलांनी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुवात केली. तेथेे महाराष्ट्र केेसरी पैलवान राहुल रामचंद्र काळभोर हे आले व मारहाण करण्यास सुरवात केली. युवराज व रोहित यांनी त्यांच्या हातावर, खांदयावर, पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर योगेश काळभोर, गणेश काळभोर, नितीन काळभोर, आदित्य कुटे, किशोर मदने, सिताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रविण काळभोर, अमित काळभोर, शुभम काळभोर असे सर्वजण तेथे आले व शिवीगाळ करून मारू लागले. व सफारी गाडीची तोडफोड केली. त्यावेळी भांडणामध्ये सौरभ याचे गळयामधील साडे सहा तोळयाची सोन्याची साखळी कोठेतरी हरवली आहे.
या प्रकरणाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास सुरु आहे. रात्रीच्या प्रकरणामुळे पुढील दोन दिवस वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन, यापुढील काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- सुरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.