पुणे : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या पतीपत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून ५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.विनोद शामराव साळुंखे (वय ५०) आणि शामला विनोद साळुंखे (वय ४६, दोघे रा़ अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ अंजाळ, ता़ जत, जि़ सांगली) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले, की कमल बाबुराव वाकुर्डेकर (वय ५५, रा़ बोरी बुद्रुक, ता़ जुन्नर) या आपली मुलगी स्मिता सावंत हिच्या नवी सांगवी येथील घरातून मुलगा सचिन याच्या धनकवडीतील घरी जाण्यासाठी १९ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता पिंपळेगुरव ते भारती विद्यापीठ या बसने प्रवास करीत होत्या़ गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील आतल्या कप्प्याची चैन उघडून त्यातील छोट्या पर्समधील ३५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व १ हजार रुपये चोरुन नेले होते.भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना महिलांच्या पर्समधील दागिने चोरणारे स्त्रीपुरुष भारती विद्यापीठसमोरील बसस्टॉपवर असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार त्यांनी साळुंखे पतीपत्नीला ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ५ गुन्हे केल्याचे कबुल केले आहे़ त्यांच्याकडून ५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, समीर बागसिराज, योगेश सूळ, बाबा नरळे, सुमित मोघे यांच्या पथकाने केली आहे़
गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:30 PM
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या पतीपत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
ठळक मुद्दे५ लाख ७४ हजार ३०० रुपयांचे २०२ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत साळुंखे पतीपत्नी ताब्यात, ५ गुन्हे केल्याचे केले कबुल