पुणे : अमेरिकेत असणाऱ्या पती आणि पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने दोघांचे वडील पाॅवर ऑफ ॲटर्नी म्हणून येथील न्यायालयात हजर राहत होते. २०२१ मध्ये त्याने दावा दाखल केला होता. त्याचे रूपांतर परस्पर संमतीमध्ये होऊन दावा निकाली निघाला.
राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. स्मितातर्फे न्यायालयात ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांनी काम पाहिले. दोघेही उच्चशिक्षित आणि पुण्यातील आहेत. इंजिनिअर आहेत. पारंपरिक पद्धतीने कांदा-पोह्यांचा कार्यक्रम करून २०१५ मध्ये दोघांचा विवाह झाला. काही दिवस सुरळीत संसार केल्यानंतर दोघे अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे गेले. राकेश नोकरी करायचा. नंतर स्मितादेखील नाेकरी करू लागली. मात्र, २०१७ पासून दोघांमध्ये वैचारिक कारणाने वाद निर्माण होऊ लागले.
एकाच घरात राहत असताना नाते संपले होते. त्यामुळे त्याने वडिलांना पाॅवर ऑफ ॲटर्नी देऊन येथील कौटुंबिक न्यायालयात क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी दावा दाखल केला. तिचेही वडील पाॅवर ऑफ ॲटर्नीच्या माध्यमातून दाव्यात हजर झाले. दोघात समुपदेशन करण्याचा प्रयत्न न्यायालयात करण्यात आला. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे दावा चालविण्यास सुरुवात झाली.
न्यायालय आणि वकिलांच्या प्रयत्नाने एकतर्फी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्याचे रूपांतर परस्पर संमतीने झाले. दोघेही ऑनलाइन व्हिडीओ काॅन्फरसिंगद्वारे अमेरिकेतून न्यायालयात हजर झाले. घटस्फोटाचा दावा निकाली निघाला. स्त्रीधन, लग्नातील साहित्य आणि एक मोठी रक्कम तिला देण्यात आली.