पुणे : व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेला पती-पत्नीने मिळून साडेचार कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
याप्रकरणी बकुल पुनीतक जैन ऊर्फ बकुल सिंग (वय ३५, रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून नीलेश सिंग व मीनाक्षी सिंग (रा. तालेरा पार्क, कल्याणीनगर) यांच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार १२ जानेवारी २०१६ ते आतापर्यंतच्या कालावधीत घडला आहे.
बकुल सिंग या येरवडा येथील एका खासगी कंपनीत टेक्निकल आर्किटेक्चर म्हणून काम पाहतात, तर त्यांच्या पतीची बावधन परिसरात एक कंपनी आहे. तसेच ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम पाहतात. आरोपी महिला व तिच्या पतीचा या महिलेशी अगोदरपासून परिचय होता. याच परिचयाचा फायदा घेत त्यांनी या महिलेला ५० टक्के फायदा देण्याच्या आमिषाने जाळ्यात खेचले.या महिलेने व त्यांच्या पतीने १ कोटी ७६ हजार रुपये गुंतवले. त्यांना ठरल्याप्रमाणे आजवर ४ कोटी ३० लाख ४४ हजार तसेच त्यांच्या पतीने विविध साईटवर केलेल्या कामाचे २३ लाख असे मिळून ४ कोटी ५३ लाख ४४ हजार रुपये त्यांनी देणे असताना काही एक पैसे न देता आरोपींनी फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहादरपुरे अधिक तपास करीत आहेत.