पुणे : पत्नीच्या मानसिक आजारपणाला कंटाळून दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पतीने मागे घेतला. समुपदेशनाच्या माध्यमातून त्या जोडप्याच्या संसाराच्या रेशीमगाठी पुन्हा जुळून आल्या आहेत. अर्जदार पतीने प्रमुख न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्याकडे घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. धोटे यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्याकडे हा दावा मध्यस्थीसाठी पाठविला. पती पत्नींच्या एकत्र आणि वेगवेगळ्या अशा सहा बैठका घेतल्या. दोघांमध्ये वैद्यकीय स्वरूपाची अडचण असल्याचे निदर्शनास आले. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी कोर्टाची पायरी चढले आहात, हे भागवत यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. पत्नीला समजावून सांगण्यात आले की, तिच्या पतीचे तिच्याबद्दलचे मत चांगले आहे. मात्र ती वैद्यकीय समस्येची बळी आहे. तिच्या आजाराला कंटाळून त्याने कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यांना दोन मुले आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचा १४ वर्षांचा मुलगा तिच्याकडे तर आठ वर्षांचा मुलगा त्याच्याकडे राहण्यास तयार होता. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या तुटलेल्या संसाराचा मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम होईल, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. मुलांना दोघांची गरज आहे. त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्यापेक्षा तिच्या आजारपणात साथ द्यावी. मानसिक आजार बरा होतो, हे समजावून सांगितले. त्यामुळे तिच्यापासून वेगळे होण्यासाठी पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. ........* मानसिक आजाराला कंटाळून संसारातून फारकत घेण्याचे प्रकार होत आहेत. या प्रकरणात पतीला वेगळे होण्यापेक्षाही तिच्या आजारपणाची त्याला जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, हे पटवून दिले. तिला समजावल्यानंतर तिने मध्यस्थीच्या बैठकीदरम्यान पतीवरील प्रेम व्यक्त केले. मानसिक आजारांकडे इतर आजारांप्रमाणे पाहिले पाहिजे. कौटुंबिक स्वरूपाच्या वादांमध्ये लोकांनी थेट कोर्टात दावा दाखल करण्यापूर्वी विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘चला बोलू या’ या वादपूर्व समुपदेशन केंद्रात यावे. ही सुविधा न्यायालयाकडून राबविण्यात येत असून कायदेशीर आणि मोफत आहे, असे भागवत यांनी सांगितले.
समुपदेशातून जुळून आल्या पुन्हा संसाराच्या रेशीमगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 7:26 PM
पत्नीच्या मानसिक आजारपणाला कंटाळून दाखल केला होता घटस्फोटाचा दावा
ठळक मुद्देघटस्फोटाचा दावा घेतला मागे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केली मध्यस्थी