पुणे : पती क्षयरोगाने आजारी पडल्यानंतर, त्याची काळजी घेण्याऐवजी ती त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. दरम्यानच्या काळात त्याचा आजार बरा झाला, त्यानंतर अमेरिकेला चांगल्या वेतनाची नोकरी मिळाली. पटत नसल्याच्या कारणावरून त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत, घटस्फोट ठरविले. मात्र, त्याला परदेशातून न्यायालयातील तारखांना वारंवार उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्याच्या वकिलांनी न्यायालयात स्काईप या तंत्राचा वापर करण्याचा मार्ग सुचविला. अखेर त्या दोघांचा न्यायालयात स्काईपवरून परस्पर संमतीने घटस्फोट झाला.शिवाजीनगर न्यायालयात नुकताच हा घटस्फोट मंजूर झाला. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश दीपाली कडुस्कर यांच्या न्यायालयात हा दावा नुकताच निकाली काढण्यात आला. या उच्चशिक्षित दाम्पत्याचे जुलै २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्या दोघांचे पटत नव्हते. त्यातच पती आजारी असताना त्याची काळजी घेण्याऐवजी ती त्याला सोडून गेली. त्याला उपचाराची गरज असताना ती तिच्याबरोबर नव्हती. तिचे वागणे म्हणजे मानसिक क्रौर्य असून, तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून त्याने न्यायालयात दावा दाखल केला होता. तिच्याकडूनही दावा दाखल करण्यात आला होता.दरम्यानच्या काळात त्याला अमेरिकेला नोकरी मिळाली. त्यामुळे तो तिकडे गेला होता. न्यायालयातील तारखांना वारंवार हजर राहणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्याचे वकील अॅड. जे. पी. बारमेडा आणि अॅड. शीतल भुतडा यांनी स्काईप या तंत्राद्वारे त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले. न्यायालयानेत्याच्या कागदपत्रांची तपासणी केली; तसेच संबंधित व्यक्ती तिच असल्याची खातरजमा केली.त्यानंतर परस्परसंमतीने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
पती-पत्नीची स्काईपवरून घटस्फोटावर मोहर, अमेरिकेतून पतीने साधला थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:18 AM