युगंधर ताजणे पुणे : आईला भेटायला म्हणून भारतात आलो होतो. त्यापूर्वी साधारण दोन महिने अगोदर पत्नी माझ्याकडे मलेशियात आली होती. आईला भेटून निघण्याची तयारीत असताना लॉकडाऊन वाढला. विमानतळावर गेल्यावर तिथे सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत असे समजले. पुन्हा घरी आलो. आता मी भारतात तर पत्नी मलेशियात आहे. भारतातील लॉकडाऊन पुढे वाढण्याची भीती वाटत असल्याने पत्नीची काळजी वाटू लागली आहे. सरकारने परदेशात गेलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्याचा विचार करावा. अशी मागणी पत्नीच्या सुटकेसाठी पतीने सरकारकडे केली आहे. लॉकडाऊननंतर 48 दिवस घरात पत्नीला एकटे राहावे लागले आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने चिंता आणखी वाढली आहे. पुण्यातील वानवडी येथे राहणाऱ्या आणि गेल्या आठ महिन्यांपासून मलेशियातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या वैभव (नाव बदलले आहे) यांची पत्नी सध्या मलेशियात आहे. ती 'डिपेंटड व्हिसावर त्यांच्याकडे गेली होती. त्या दरम्यान अनिल आईला भेटण्यासाठी भारतात आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर ते पुन्हा मलेशियात जायला निघाले असताना त्यांना लॉकडाऊन असल्याने जाता येणार नसल्याचे समजले. अशा परिस्थितीत मलेशियात असणाऱ्या आपल्या पत्नीची चिंता त्यांना सतावू लागली. याचे मुख्य कारण म्हणजे भाषेची अडचण. पत्नीला मराठी आणि हिंदी याशिवाय इतर कुठली भाषा येत नसल्याने त्यांना संवाद साधण्यास अडचण येत आहे. मलेशियात देखील लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कित्येकजण वेगवेगळ्या देशात अडकून पडले आहेत. काही देशांनी आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी स्वतंत्र विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे. भारतात देखील ऑस्ट्रेलियन नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी नेल्याची माहिती मिळाली आहे. अशावेळी भारताने देखील आपल्या नागरिकांना पुन्हा आणण्यासाठी विशेष मोहीम राबवल्यास शेकडो परदेशी भारतीयांना दिलासा मिळेल. आपण सातत्याने पीएमओ आणि सीएमओ यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देखील संपर्क साधला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. असेही अनिल यांनी यावेळी सांगितले.
शेजारच्यांना किती त्रास द्यायचा ? सोसायटीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना फोन केला असता ते मदतीला धावून येतात. ते वेगवेगळ्या देशाचे रहिवासी आहेत. आवश्यक वस्तू आणून देणे, संपर्क करून देणे, कुठे बाहेर जायचे असल्यास वाहन बुक करणे, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत ते पोहचवणे. त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरू असून त्यांनी दिलेली माहिती पत्नीला देतो. जेणेकरून तिला बाहेर काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दरवेळी शेजारच्या व्यक्तींना त्रास द्यायचा हे बरे वाटत नाही. असे वैभव यांनी सांगितले.