पुणे : पहिले लग्न झाले असल्याचे शासकीय अधिकारी असलेल्या दुसऱ्या पत्नीला समजल्यानंतर तिला एकांतातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पत्नीलाच २५ लाखांची धमकी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी वारजे पोलिसांनी ३९ वर्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी ३० वर्षांच्या महिलेने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शासकीय अधिकारी आहेत. आरोपीचे पहिले लग्न झाले असून त्याला एक वर्षाची मुलगी आहे. ही गोष्ट त्याने लपवून ठेवून दुसरे लग्न केले. फिर्यादी यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यांचे २२ तोळे सोन्याचे दागिने विश्वासाने घेऊन त्याचा अपहार केला. दरम्यान, फिर्यादी यांना त्याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. फिर्यादी यांनी आरोपीला पहिल्या लग्नाविषयी विचारणा केली. त्यावेळी त्याने दोघांचे एकांतामध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांना निनावी चिठ्ठी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेने वारजे पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.