पुणे : हडपसर परिसरातून दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़ सहप्रवासी महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
बाळासाहेब मच्छिंद्र सोनार (वय ५२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात सोनार यांची पत्नी वैशाली (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी मोटारचालक अरंजय प्रकाश बुद्रुक (वय ३५, रा. गाडीतळ, हडपसर) या मोटारचालकाला अटक केली आहे.
सोनार व त्यांची पत्नी दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी पॉवर हाऊसजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात बाळासाहेब यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी वैशाली जखमी झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.