पुणे : परस्पर संमतीच्या दाव्यातून तिने सहमती काढून क्रूरता दाखवली. परिणामी, पतीलाही सहमती काढून घ्यावी लागली व परस्पर संमतीने दाखल केलेल्या दाव्याचे वादातील दाव्यात रुपांतर झाले. त्यानंतर पतीने न्यायालयात पत्नी विरुद्ध क्रूरता आणि विभक्ती या दोन मुद्यावर नवीन दावा दाखल करून त्यावर निकाल घेतला. पत्नीला वैवाहिक जीवन चालू ठेवण्यास स्वारस्य नसल्याचा निष्कर्ष काढत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.बी.येरलेकर यांनी या दाव्यात घटस्फोट मंजूर केला.
न्यायालयात वादातून दाखल झालेल्या दाव्यात परस्पर संमतीने घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल दावा हा वादातून निकाली निघाला आहे. यासाठी पतीला पाच वर्षे संघर्ष करावा लागला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये दाखल केलेला दावा मार्च 2023 मध्ये निकाली निघाला.
राहुल आणि रिना (नावे बदलली आहेत) दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. पहिल्या दाव्यातील सहमती काढून घेण्याचे आणि दुसऱ्या दाव्यात राहुलच्या वतीने अँड. रोहित देशपांडे, अँड. दीप्ती देशपांडे आणि अँड. गोरख लामखेडे यांनी काम पाहिले. फेब्रुवारी 2015 मध्ये दोघांचा विवाह झाला. तो पुण्याचा, तर ती मुंबईची होती. लग्नानंतरही ती मुंबई येथे नोकरी करत होती. विकेंडला येथे येत असत. किरकोळ गोष्टीवरून ती वाद घालायची. भांडण करायची. तिने स्वतंत्र राहण्यास पतीला भाग पाडले. मात्र, घरखर्चासाठी हातभार लावला नाही. दरम्यान, तिची पुण्यात तात्पुरती बदली झाली. त्यानंतर उशीराने कामावरून आल्याचे विचारल्याने तिने सासऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर हे नेहमीच चालत असे. ती वर्णावरूनही टोमणे मारत असत. घरच्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. पतीने समेट घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर परस्पर संमतीने दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात दावा दाखल केला. आपापल्या वस्तूची, सामानाची देवाणघेवाण सुद्धा केली त्यानंतर तिने सहमती काढून घेतली. नाईलाजास्तव पतीलाही सहमती काढून घ्यावी लागली. पतीने दाखल केलेल्या या दाव्यात ती हजर राहिली. मात्र, तिने न्यायालयात म्हणणे मांडले नाही.