पुणे : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीलाच महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणात अटक महिलेच्या साथीदाराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वी. कश्यप यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. सुरुवातीला आरोपीवर ३०७ कलम लावले होते. मात्र व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ३०२ कलमाची वाढ करण्यात आली आहे.
राजेश बाबूराव जगताप असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. तर मुकेश सुरेश राजपूत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा पोलिस ठाणे हद्दीत २५ जुलै रोजी मुकेश सुरेश राजपूत या व्यक्तीस त्याचा बायकोने तिच्या साथीदाराच्या मदतीने रॉकेल टाकून जिवंत जाळले असे आरोप होते व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने भादंवि कलम ३०२ प्रमाणे येरवडा पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने न्यायालयात ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. सौरव जायभाये यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. महेश साखरे, ॲड. आकाश चिकटे, ॲड. शैलेश कांबळे, शशांक पाटील यांनी मदत केली.