पिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्याच्या पत्नीचा नाडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला. जाधववस्ती, रावेत येथे बुधवारी (दि. २२) रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खैरूनबी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय ३८, रा. जाधव वस्ती, रावेत), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मलिक शेंकुबर नदाफ (वय ३९, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरुनबी यांचा आरोपी पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत होता. या त्रासाला कंटाळून खैरूनबी त्याच्यापासून विभक्त झाल्या होत्या. मित्राच्या ओळखीने खैरूनबी यांना रावेत येथील जाधव वस्तीत भाडेतत्वाने घर मिळाले. १२ व नऊ वर्षांची दोन मुले व सहा वर्षांची एक मुलगी, अशा तीन मुलांसह खैरूनबी जाधवस्ती येथे राहात होत्या. दरम्यान, आरोपी हैदर नदाफ हा मंगळवारी (दि. २१) खैरुनबी यांच्याकडे आला होता. मुलांना घराबाहेर थांबवून आरोपीने नाडीने खैरुनबी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिनही मुलांना रिक्षातून घेऊन जाऊन लोणी काळभोर येथे नातेवाईकांकडे मुलांना सोडून आरोपी पतीने पलायन केले. खैरुनबी यांचा मोबाइल आरोपी घेऊन गेला.
गेल्या दोन दिवसांपासून खैरूनबी घराबाहेर दिसल्या नाहीत, अशी माहिती शेजारी राहणाऱ्या महिलेने खैरुनबी यांच्या मित्राला दिली. त्यानुसार मित्राने खैरूनबी यांच्या घरी येऊन पाहणी केली असता खैरूनबी यांच्या घराला कुलूप दिसले. त्यामुळे मित्राने घरमालक व स्थानिकांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता खैरुनबी घरात मृतावस्थेत आढळल्या. याबाबत खैरुनबी यांचा भाऊ मलिक शेंकुबर नदाफ यांना माहिती देण्यात आली. त्यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.