मंचर : शिक्षणासाठी लागणारे पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने जिवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. या घटनेत पत्नी बालंबाल बचावली आहे. मंचर घोडेगाव रस्त्यालगत सोमवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पती अनिल श्रीराम राठोड (रा. वृंदावन सोसायटी मंचर) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी वनिता अनिल राठोड यांनी फिर्याद दिली आहे. वनिता हिचा पती अनिल हा अवसरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी वनिता राठोड यांनी पती अनिल यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी मागितली. त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुझ्या माहेरावरून पैसे माग असे तो म्हणाला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वादावादी झाली.
वनिताने अनिलला माहेरी निघून जाण्यास सांगितले. यावर पत्नी वनिता हिने तुम्ही मला पैसे द्या किंवा माहेरी सोडा असे सांगितले असता, दोघेही घराबाहेर पडले. पती अनिल राठोड याने पत्नीबरोबर गोड बोलून चल आपण नाष्टा करू, फिरायला मंदिरात जाऊ असे सांगून अनिलने वनिताला तपनेश्वर मंदिराकडे नेले. रस्त्याने पायी जात असताना मंचर घोडेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत त्याने वनिताला ढकलून दिले.
सुदैवाने वनिता बचावली आहे. तिच्यावर उपचार करण्यात आले. वनिता शुद्धीवर आल्यानंतर अनिल राठोड याने इस्त्रीच्या कारणावरून वाद झाला आहे, असे तू सर्वांना सांग अशी धमकी दिली. मात्र, खरे कारण सांगत वनिताने अनिल राठोड विरोधात तक्रार दिली. त्यानसुार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.