बारामती (पुणे) : अंगावर डिझेल ओतून पेटवून देऊन पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीस बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
उमेश रामचंद्र गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. यवत (ता. दौंड) येथे १९ मे २०१२ रोजी ही घटना घडली होती. उमेश गायकवाड याने त्याची पत्नी उषा हिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देऊन तीची हत्या केली. याबाबत यवत पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. उमेश यास दारूचे व्यसन होते. त्यातच तो गावठी दारू आणून त्याची विक्री करत होता. त्यास मयत उषा विरोध करत असल्याने आरोपी उमेश पत्नी उषा हिला मारहाण करीत असे. १९ मे २०१२ रोजी उमेशने विकायला आणलेली गावठी दारू विकली न गेल्याने त्याने कॅनमधील दारू प्यायला सुरुवात केली. मयत उषाने त्यास विरोध केला. त्याचा दारूचा ग्लास ओतून दिला. त्यावरून उमेश याने मयत उषास मारहाण केली. त्यामुळे उषाने राहिलेली दारू ओतून दिली. त्यानंतर उमेशने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले.
उषाने पेट घेतल्यावर त्याने तिला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यालाही हाताला भाजले. पत्नी उषाने आरडाओरडा केल्यावर त्यांच्या मुलांनी घटना पाहिली होती. त्यानंतर उषा हीस प्रथमोपचार झाल्यावर ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने मृत्यूपूर्व जबाब दिला. तिच्या जबाबाप्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यांचा मुलगा याचा जबाब नोंदवला होता. न्यायालयात मुलाने उमेशच्या विरोधात जबाब दिला. तसेच मयत उषा हिचा मृत्यूपूर्व जबाब न्यायालयात सिध्द झाला. आलेला पुरावा हा उमेशच्या विरोधात होता. त्या अनुषंगाने सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून बारामतीच्या अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी उमेश याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास तात्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी एएसआय एन. ए. नलवडे व पो. ना. वेणूनाद ढोपरे यांनी सहकार्य केले.