पुणे : पतीवर जादूटोण्याचा प्रयोग करून जेवणातून नखे आणि इतर वस्तू खायला घातल्याप्रकरणी पत्नीसह सासू-सासरे, मेव्हणा, मेहुणी, साडू या सहा जणांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश के.एन. शिंदे यांनी फेटाळला.
पतीने यांच्याविरुद्ध वाकड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नीची किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. ही बाब पत्नीने तिच्या सासू-सासऱ्यांना सांगितली. फिर्यादीवर अघोरी जादूटोण्याचा प्रयोग करून त्यांना नखे खायला घालणे, मायाजाल नावाच्या वस्तूंसह इतर वस्तू खायला देणे असे प्रकार केले. याबाबत मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग मिळाल्याचे त्यांनी सासू-सासऱ्यांना सांगितले. यामुळे सासरकडच्यांनी फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या केसमध्ये सहा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, आरोपींनी भोंदू बाबा यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांना कोणकोणत्या वस्तू खायला दिल्या आहेत याचा सखोल तपास करणे बाकी आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करायचे आहेत. आरोपींचा गुन्हा अंधश्रद्धेला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणारा आहे. संगनमत करून फिर्यादी पतीला जादूटोणा करून वश करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.