पुणे :पुणे जिल्ह्यातील विविध लग्नांमध्ये वऱ्हाडी म्हणून प्रवेश करून चोऱ्या करणाऱ्या नवरा बायकोला पुणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ९२ तोळे सोने आणि स्वीफ्ट कारसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विलास मोहन दगडे (वय २८, राहणार -चंदननगर, पुणे) व जयश्री विलास दगडे (वय २५, राहणार -चंदननगर पुणे )यांना अटक करण्यात आली आहे. विलास व जयश्री दगडे हे मुळचे करमाळा येथील शेलगाव वांगी या गावचे असून तेथील काही जण अशाच प्रकारे गुन्हे करत असतात़. सुमारे १० महिन्यांपूर्वी ते दोघे मोलमजुरी करण्यासाठी पुण्यात आले़ त्यांना एक लहान मुलगी आहे़. गेल्या काही महिन्यात त्यांच्या वागणूकीत खूप बदल झाल्याचे ते राहतात, त्या भागातील लोकांच्या लक्षात आले़. पण ते काय काम करतात, याची माहिती लोकांना नव्हती़ . लग्नाची तिथी पाहून ते लहान मुलीला आईकडे ठेवून गाडी घेऊन बाहेर पडत असत़. महामार्गावरील मंगल कार्यालयातील सजावट, वऱ्हाडी मंडळी, बाहेर उभ्या असलेल्या गाड्या पाहून या ठिकाणी आपल्याला हात साफ करता येईल का याचा विचार करुन ते तेथे थांबत़. जयश्री अगोदरच लग्नाला जात असल्यासारखा पेहराव करीत असे़. तिच्या अंगावर भरजडी साडी आणि अनेक दागिने घातलेले असत़. विलासही गॉगल, फेटा घालून मंगल कार्यालयात जात़ असे. त्यांचा पेहराव पाहून ते लग्नालाच आल्याचा उपस्थितींना समज होत. आत जाण्यापूर्वी ते बाहेरील बोर्डावरील वधु, वराकडील नावे वाचून घेत़. तेथे लग्नपत्रिका मिळाली तर ती पाहून ठेवत़ वधुकडील लोकांनी विचारले तर नवरदेवाचे नाव सांगायचे आणि जर वराकडील लोकांनी विचारले तर नवरीचे नाव सांगायचे. त्यानंतर नवरीच्या किंवा नवरदेवाच्या रुममध्ये अलगद प्रवेश करायचे. त्या ठिकाणी लग्नाच्या तयारी असल्याने कपडे घालणे, वधुच्या मेकअपची गडबड असायची. त्यावेळी विलास हा खोली बाहेर थांबत असे़ संधी मिळताच तेथील पर्स व इतर पिशव्यांमध्ये तपासून रोकड, दागिने ताब्यात घेत व गूपचुप तेथून पसार होत असे़.
संशय येऊ नये म्हणून केला आहेरवधुच्या खोली बाहेर रेंगाळल्याने त्यांच्यावर संशयही आला होता़. त्यांच्याकडे विचारणा केल्यावर जयश्री या जाण्याची गडबड आहे, असे सांगून आहेर देण्यासाठी आल्याची थाप मारत असे. वधुच्या हातात आहेर देऊन तेथून निसटून जात होते़. त्यांच्यावर २ ते ३ ठिकाणी असा प्रसंग आला होता़. चोरीच्या पैशांतूनच त्यांनी कार विकत घेतली होती़. चोरीतून मिळालेले दागिने विकून त्यातून पुण्यात फ्लॅट घेण्याचा त्यांचा विचार होता़.
या बहाद्दूर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कामगिरी ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक निरीक्षक गणेश क्षीरसागर, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, जीवन राजगुरु, सहायक फौजदार दत्तात्रय पठाण, श्रीकांत माळी, प्रकाश वाघमारे, खंडु निचीत, मोरेश्वर इनामदार, मुकुंद अयाचित, सचिन गायकवाड, राजू मोमीन, गुरु गायकवाड, सुभाष, प्रमोद नवले, गणेश महाडीक, रौफ इनामदार, चंद्रशेखर मगर, विशाल साळुंके, विजय कांचन, गुरु जाधव, डोंगरे, बाळासाहेब खडके, एस़ एऩ कोरफड, एस़ पी़ मोरे यांच्या पथकाने केली आहे़ .