पुणे : दोघेही शहरातील विविध ठिकाणांहून वाहने चोरायचे आणि विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करायचे. मागील जवळपास दोन महिन्यांपासून दोघांनी पोलिसांच्या नाकात दम आणला होता. पोलिस दोघांचा कसोशीने शोध घेत होते. अखेर वाहन चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने लोणी काळभोर भागातील वडकी नाला येथून अटक केली.
आरोपींनी शहर परिसरातून चोरलेली वाहने नागपूर, शिर्डी, श्रीरामपूर भागात विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोघांकडून १२ लाख ७० हजार रुपये किमतीची तब्बल १७ वाहने जप्त केली असून, यामध्ये ८ चारचाकी आणि ९ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील असून, त्यांनी संगनमताने शहरातील विविध भागांत गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
शाहरुख राजू पठाण (वय २४, रा. कुंजीरवाडी), आयशा शाहरुख पठाण उर्फ पूजा जयदेव मदनाल ( वय २१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनी मिळून शहरातील सिंहगड रोड, हडपसर, वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क भागातून वाहने चोरल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्ता भागातून वाहने चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी आरोपींना पकडण्याचा सूचना केल्या होत्या. तेव्हापासून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तांत्रिक तपासावरून हे वाहनचोरीचे गुन्हे एक पुरुष व एक महिला मिळून करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहायक निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना वाहन चोरीचे गुन्हे करणारे आरोपी हे लोणी काळभोर परिसरातील वडकी नाला येथे असल्याची माहिती अंमलदार उत्तम तारू, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी शाहरुख आणि आयेशा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीची १७ वाहने जप्त केली. तर, विविध पोलिस ठाण्यांतील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.