पुणे : पती दारू पिल्यानंतर पत्नीशी अमानुषपणे वागायचा. सतत तिला मारहाण करण्याच्या धमक्या द्यायच्या. त्यामुळे पत्नीला त्याच्याशी संसार करणे अशक्य झाले. तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. दोन वषार्पूर्वी पत्नीने पतीला नोटीस पाठवून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सुचविले होते. परंतु पतीने त्यासाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने तिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी अर्जदार पत्नीने दिलेला पुरावा ग्राह्य धरून क्रूरतेच्या कारणावरून पत्नीला घटस्फोट मंजूर केला.
प्रिया आणि प्रथमेश (नाव बदललेले) यांचे लग्नापूर्वी असलेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी दहा वर्षांपूर्वी लग्न केले. प्रियाला प्रथमेशच्या दारूच्या व्यसनाची लग्नाच्या पूर्वीपासूनच माहिती होती. प्रियाने प्रथमेशकडून वचन घेतले होते की, लग्नानंतर दारू पिणार नाही. परंतु तरीही प्रथमेशने लग्नानंतर दारूचे व्यसन कायम ठेवले. तो दारूच्या अमलाखाली आल्यानंतर प्रियाला मारहाण करायचा व तिच्याकडूनच दारूपिण्यासाठी पैसे मागायचा.
लग्नानंतर एक वर्षांनी त्यांना मुलगी झाली. परंतु तरीही प्रथमेशचे दारूचे व्यसन सुटले नाही. त्याने प्रिया व मुलीच्या पालनपोषणाची कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही. मुलीच्या जन्मानंतर त्याने प्रियाला सांभाळले नाही. त्यामुळे प्रियाला त्याच्याशी संसार करणे अशक्य झाले होते. दोन वषार्पूर्वी प्रियाने प्रथमेशला नोटीस पाठवून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सुचविले होते. परंतु त्याने त्यासाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीने दिलेला पुरावा ग्राह्य धरून क्रूरतेच्या कारणावरून पत्नीला घटस्फोट मंजूरकेला.