लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: पत्नीच्या धाडसामुळे आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी पती-पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यातून जीव वाचला आहे. एका बाजूला शेतकरी दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी व मध्ये बिबट्या असा थरारक अनुभव विठ्ठलवाडी येथील शेतकरी बबन भालेराव व त्यांची पत्नी शिल्पा यांनी अनुभवला आहे.
दररोज बिबट्याच्या संदर्भात अनेक घटना होत असतानाही वनविभाग मात्र गप्प का असा सवाल नागरिकांमधून होत आहे. विठ्ठलवाडी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तसेच महावितरण कंपनीची थ्रीफेज वीज शुक्रवार ते रविवार रात्री उपलब्ध असते. दिवसा पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यावे लागत आहे. विठ्ठलवाडीत रविवारी रात्री बबन भालेराव घराजवळच असलेल्या ऊस पिकाला पाणी भरत होते. पत्नी शिल्पा भालेराव बंगल्याच्या अंगणात येऊन पाण्याबाबत चौकशी करत होत्या. त्यांच्या घरापासून वीस फूट अंतरावर ऊसाजवळ बिबट्या होता. यावेळी आरडाओरड झाल्याने आई सुनीता भालेराव देखील घराबाहेर आल्या. पलीकडे उसाला पती बबन पाणी भरत असल्याने शिल्पा जिवाच्या आकांताने ओरडली ''''अहो, पळा पळा बिबट्या जवळ आलाय''''. बबन यांना नक्की बिबट्या कोठे आहे हे समजेना. अंधारात चाचपडत ते शेतातून घराकडे पळत सुटले. ते ज्या रस्त्याने घरी येत होते त्याच दिशेला बिबट्या उभा होता. आता नक्कीच काहीतरी विपरीत घडणार पतीवर बिबट्या हल्ला करणार असे पत्नी शिल्पा यांना वाटले. पण नशीब बलवत्तर होते म्हणून हातात असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाने बिबट्या विचलित झाला. बिबट्या येथून निघून गेला अन् बबन सुखरूप घरात आले. आई सुनीता यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडेना. सुनेला घट्ट धरून त्यांनी हंबरडा फोडला. सासू आणि सून एकमेकीला धरून रडू लागल्या. दोघींना बबन यांनी धीर दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. वनविभाग मात्र कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नसून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.