पुणे : पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या पतीला दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी पत्नीने आपल्या दहा महिन्यांच्या बाळासह न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात अर्जदार पत्नीच्या वतीने अॅड. उमेश कदम यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोघांचा मुस्लिम कायद्याप्रमाणे विवाह झाला होता. या विवाहासाठी तिच्या आई-वडिलांनी पाच ते सहा लाख रुपये खर्च केला होता. लग्नामध्ये इच्छेप्रमाणे चारचाकी गाडी, एलईडी, पाच तोळे सोने तसेच एक लाख रुपये दिले नाहीत म्हणून तिचा सासू, नणंद आणि जावेने छळ सुरू केला. सर्व वस्तू, सोने आणि कार दिल्याशिवाय माहेरी पाठवणार नाही, असे त्यांनी सांगितले. तिला वेळोवेळी टोचून बोलणे, धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. दरम्यान, या जाचाला कंटाळून ती आपल्या १० महिन्यांच्या बाळाला घेऊन आई-वडिलांकडे निघून गेली, त्या वेळी पतीने दुसरे लग्न केले. बाळाचे आजारपण आणि स्वत:चा खर्च करण्यास असमर्थ असल्यामुळे तिने आपल्या १० महिन्यांच्या बाळासह न्यायालयात धाव घेतली. कौटुंबिक हिंसाचारांतर्गत तिने न्यायालयात अर्ज केला. (प्रतिनिधी)
पोटगी देण्याचा पतीला आदेश
By admin | Published: January 11, 2017 3:39 AM