लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : भादलवाडी (ता. इंदापूर) येथे धारदार शस्त्राने गळा चिरून झालेल्या युवकांचा खून हा विवाहबाह्य प्रेमसंबंधातून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी २४ तासांतच या खुनाचा तपास केला. भिगवण पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
रावणगाव (ता. दौंड) येथील महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, ता. दौंड) या युवकाचा भादलवाडी (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि.२४) धारदार कोयत्याने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी महेश चव्हाणचा भाऊ नितीन चव्हाण याने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत पथके रवाना केली होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महेश चव्हाण याच्या पत्नीचे अकोले (ता. इंदापूर) येथील युवकाशी लग्नाआधी प्रेमसंबंध असल्याची बाब तपासात समोर आली. पोलिसांनी अकोले येथे छापा टाकून अनिकेत ऊर्फ बबलू विकास शिंदे (वय २१, रा. अकोले, ता. इंदापूर) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अनिकेत शिंदे यांने प्रेमसंबंधामध्ये अडथळा आणणाऱ्या महिलेच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली.
अनिकेत शिंदे यांचे महेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबध होते. पतीमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हते. अनिकेत याचा बंधू गणेश शिंदे याचा त्याच्या घटस्फोटास महेश कारणीभूत असल्याचा समज झाला होता. त्यामुळे गणेश शिंदे हाही महेशवर चिडून होता. अनिकेत शिंदे व महेश शिंदे यांनी नियोजन करून महेश चव्हाण यास बोलावून घेऊन भादलवाडी (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा जोड कालव्याच्या बोगद्याच्या डम्पिंग यार्डजवळ नेऊन धारदार कोयत्याने गळा कापून खून केला. आरोपींना इंदापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.