पुणे : मतदानासाठीचे साहित्य व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी दोन दिवस ७०० बस धावल्या. पण त्यापैकी एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला. पीएमपीच्या दररोज किमान १५० बस मार्गावर बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून पीएमपीच्या बस घेतल्या जातात. मतदानच्या दिवशी व आदल्यादिवशी मतदान साहित्य व कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी या बसचा वापर केला जातो. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने पीएमपीच्या ७०० बस घेतल्या होत्या. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस घेण्यात आल्या. पीएमपीच्या बसच्या ब्रेकडाऊनचे सध्याचे प्रमाण दररोज किमान १५० ते १६० एवढे आहे. त्यामुळे एवढ्या जास्त बस निवडणुक कामासाठी दिल्या जाणार असल्याने पीएमपी प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. निवडणुकीचे सामान वेळेत व सुरक्षितपणे मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे व परत आणण्याची महत्वाची जबाबदारी पीएमपीवर होती. एकही बस मार्गावर बंद पडू न देता मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी, यासाठी पीएमपी प्रशासनाकडूनही मागील काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते.अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, एकुण ७०० बसमध्ये सुमारे ३०० नवीन सीएनजी बस, सुमारे १०० मिडी बस आणि उर्वरीत जुन्या बस होत्या. जुन्या बस निवडताना त्यांचा फिटनेस आधी पाहण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बसची काळजीपुर्वक तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार काही दुरूस्त्या करण्यात आल्या. त्यानंतरच या बस निवडणुक कामासाठी सोडण्यात आल्या. मतदानापुर्वी आठ दिवसआधीपासून हे काम सुरू होते. या बसमध्ये एकही भाडेतत्वावरील बस नव्हती. लोकसभा निवडणुकीवेळी २ बस बंद पडल्या होत्या. त्यामुळे पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांनी सर्व बसची काटेकोरपणे तपासणी करण्याची सुचना दिली होती. त्यामुळे रविवारी व सोमवारी दोन्ही दिवशी एकही बस बंद पडली नाही. तसेच बस बंद पडल्यास तातडीने दुरूस्त करण्यासाठी ठिकठिकाणी दुरूस्ती पथक तैनात करण्यात आले होते. पण त्याची गरज पडली नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.--------------
हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 8:06 PM
एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला...
ठळक मुद्देपीएमपीच्या दररोज किमान १५० बस मार्गावर बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप