राजगुरूनगर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा ८६वा बलिदान दिन गुरुवारी (दि. २३) साजरा होत आहे. या तीन हुतात्म्यांपैकी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळाचे-राष्ट्रीय स्मारकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये केलेली पाच कोटी रुपयांची तरतूद कागदावरच राहिली आहे, तर बसस्थानकासमोर होणाऱ्या हुतात्मा स्मारकाची जागा नगर परिषदेकडे हस्तांतर होऊनही निधीअभावी काम सुरू झालेले नाही.हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुवाड्यावर क्रांतिकारकांचा इतिहास पुढील पिढीला समजण्यासाठी आणि त्यांच्या कार्यापासून तरुणांमध्ये देशभक्ती निर्माण होण्यासाठी भव्य स्मारक उभे करण्यासाठी शासनाने राजगुरुंच्या जन्मशताब्दीपासून प्रयत्न सुरू केले. २००८ ला या पुरातत्व विभागामार्फत या वाड्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यात आले. राजगुरुंची जन्मखोली व भीमा नदीच्या बाजूने तटबंदीचे काम झाले. परंतु या कामात भ्रष्टाचार झाला म्हणून त्या वेळी राजगुरुप्रेमींनी आंदोलन करून चौकशीची मागणी केली. (वार्ताहर)
हुतात्मा राजगुरुंचे राष्ट्रीय स्मारक अर्धवट
By admin | Published: March 20, 2017 4:33 AM