लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त उद्यापासून (गुरुवार) सुरू होेणाऱ्या राज्यस्तरीय पुरुष गट व्यावसायिक आणि महिला कबड्डीत पुणेकरांना राज्यातील अव्वल कबड्डीपटूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी यांच्या मान्यतेने बाबूराव सणस मैदानावर १४ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत व्यावसायिक पुरुष विभागात एअर इंडियाचा विकास काळे, सिद्धार्थ देसाई, महिंद्राकडून अनंत स्वप्निल शिंदे, सचिन शिंगाडे, नाशिक आर्मीमधून मोनू गोवीत, इन्कम टॅक्सकडून नीलेश साळुंखे, तुषा पाटील, युनियन बँकेचे अजिंक्य कापरे, सेंट्रल रेल्वेमधून गुरुविंदरसिंग, महाराष्ट्र पोलीसमधून रोहित बन्ने, महिंद्रा राजपूत, बाजीराव होडग, तर महिला गटातून आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ व किशोरी शिंदे, तसेच राष्ट्रीय खेळाडू ईश्वरी कोंढाळकर व कोमल जोरी तसेच मोनिका शिंदे, सायली केरीपाळे, अरुणा सावंत, पूजा शेलार, ललिता घरत, श्रद्धा पवार, रुबिना शेख, कांचन चव्हाण, अलिशा पाटील, शिवनेरी चिंचवले, सायली जाधव तसेच भारतीय रेल्वे संघाच्या मीनल जाधव, रक्षा नारकर, ईश्वरी कोंढाळकर यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. स्पर्धेकरिता खास मातीची ४ क्रीडांगणे (पुरुषांसाठी २ व महिलांसाठी २) तयार केली असून स्पर्धा सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत अशा एकूण ३४ पुरुष व महिला संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर अशा जिल्ह्यांतून सांघिक महिला व व्यावसायिक पुरुष संघांचा सहभाग आहे. या स्पर्धेत एकूण ६३० खेळाडू व अधिकारी यांचा समावेश आहे. अशा भव्यदिव्य कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी सणस मैदानावर पुरुषांची २ व महिलांची २ क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (११ मे) सायंकाळी ५.३० वाजता न्याय व समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेवक हेमंत रासने आणि कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हुतुतू...चा घुमणार आवाज
By admin | Published: May 11, 2017 4:50 AM