पुणे – शहरातील प्रस्तावित 'हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट' (एचसीएमटीआर) प्रकल्पाचे रूपांतर ‘हायब्रीड मेट्रो निओ’ प्रकल्पात करण्यासाठी चाचपणी सुरू असून, या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम 'महामेट्रो'ने हाती घेतले आहे. 'मेट्रो निओ'सह वाहनांसाठी एकच मार्ग असणारा हा देशातील पहिला हायब्रीड प्रकल्प असेल. महानगरांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी 'महामेट्रो'ने 'मेट्रो निओ'ची संकल्पना पुढे आणली.
'महामेट्रो'च्या पुढाकाराने देशातील पहिला 'मेट्रो निओ' प्रकल्प नाशिक येथे साकारत आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही या प्रकल्पाचा विचार करण्याची सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली होती. त्यामुळे पुण्यातील हा प्रकल्प वेगाने मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. वेगाने वाढणाऱ्या पुण्यासाठी अंतर्गत रिंगरोड असावा, या हेतूने १९८६ मध्ये 'एचसीएमटीआर' प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. अंतिम आराखड्यानुसार बोपोडी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, विमाननगर आणि विश्रांतवाडी या भागांतून 'एचसीएमटीआर' प्रकल्प राबविण्यात येणार होता. ३६ किलोमीटर लांबीच्या 'एचसीएमटीआर'मध्ये चार मार्गिका खासगी वाहनांसाठी आणि दोन मार्गिका बससाठी राखीव होत्या. मात्र, आर्थिक व्यवहार्यतेअभावी हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही. आता याच मार्गावर 'मेट्रो निओ'ची संकल्पना राबविल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांची ने-आण करणे शक्य होणार आहे. 'मेट्रो निओ' मार्गावर वाहनांसाठी मार्गिका राखून ठेवल्यास महानगरांसाठी तो पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो. सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या 'मेट्रो निओ'चे कोचेस विजेवर चालत असल्याने इंधनाचीही बचत होते. ताशी ९० किलोमीटर वेगाने रबरी टायरवर धावणाऱ्या या मेट्रोसाठी रुळांची गरज नसली, तरी स्वतंत्र कॉरिडॉर मात्र आवश्यक असतो. असे असले तरी नेहमीच्या मेट्रोच्या एक तृतीयांश खर्चात 'मेट्रो निओ'ची उभारणी शक्य होते. 'मेट्रो निओ'च्या निर्धारित मार्गापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी फिडर बसेसचीही व्यवस्था या प्रकारात करण्यात येते. यासाठी 'मेट्रो निओ'च्याच कोचेसचा वापर केला जातो. प्रवासी संख्येने ठरावीक टप्पा ओलांडल्यास 'मेट्रो निओ'चे अर्बन ट्राम किंवा नेहमीच्या मेट्रोमध्ये रूपांतर करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.
कोटः सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्दिष्टाने दमदार पावले गेल्या चार वर्षांत पडली. मेट्रो आणत असताना 'मेट्रो निओ'चाही वापर शहरात करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, त्यामुळे शहरवासीयांसाठी आणखी एक सुरक्षित, गतिमान आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प येणार आहे. - गणेश बिडकर, सभागृह नेता.