लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनल्स होण्यास आणखी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. फलाट एक सह दोन व तीनवर पूर्ण कव्हर शेडही बसवलेले नाही. स्थानकाला पोहचण्यास व्यवस्थित रस्ता नाही, असे असताना या टर्मिनल्सवर हैदराबाद एक्स्प्रेस ९ जुलै रोजी येत आहे. ही रेल्वे गाडी जबरदस्ती लादल्याने येथे पिण्याचे पाणी, शौचालय, पार्किंग आदी सुविधा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. स्थानकावर सुविधा नसताना हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस सुरू होत आहे. याचा प्रवाशांना फायदा होण्यापेक्षा मनस्तापच होण्याची शक्यता अधिक आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने पुणे विभागाची मान्यता न घेताच एकतर्फी हैदराबाद-हडपसर रेल्वेची घोषणा केली. हडपसर स्थानकावरची वस्तुस्थितीची माहिती न घेताच दक्षिण मध्य रेल्वेने आरक्षण प्रणालीत आरक्षण तिकीट काढण्याची सोय केली. तर दुसरीकडे हडपसर स्थानकावर प्रवासी सुविधा नसल्याने पुणे विभागाने यास नकार दर्शविला होता. मात्र रेल्वे बोर्डतून सूत्रे हलल्याने पुणे विभागाला या गाडीस मंजुरी द्यावी लागली. अवघ्या चार दिवसांत ही गाडी सुरू होईल. मात्र प्रवाशांसाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी आता रेल्वेला धावाधाव करावी लागत. सुविधा नसताना गाडी सुरू करण्याचा आग्रह का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
बॉक्स 1
प्रवाशांसाठी या सुविधा हव्यात
1 फलाटावर प्रवाशांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे याकरता कव्हर ओव्हर शेड असणे गरजेचे आहे. हडपसर स्थानकावर ते पूर्ण स्वरूपात नाही. मोकळा असलेला भाग अधिक आहे.
2.प्रवाशांना बसण्यासाठी वेटिंग रूम हवी.
3.डबा कुठे येईल ते कळण्यासाठी कोच डिस्प्ले हवेत.
4. खाद्यपदार्थ स्टॉल
5. वाहने लावण्यासाठी प्रशस्त पार्किंग.
6. उद्घोषणाची सोय.
7. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. बस व रिक्षा याची उपलब्धता.
8.स्थानकावर येण्यासाठी प्रशस्त रस्ता .
9.प्रवासी सुरक्षिततेसाठी आरपीएफ व लोहमार्गची ठाणे ?????
10.आरक्षण केंद्र .
ही सर्व सुविधा निश्चितच हडपसर स्थानकावर उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी आणखी कालावधी लागेल. सुविधा पूर्ण नसताना गाडी धावणार आहे.
------------------------
४ दिवसांत सुविधा मिळतील पण ...
९ जुलै रोजी हैदराबादहून हडपसरला रेल्वे येईल. तोपर्यंत प्राथमिक सुविधा देण्यासाठी रेल्वेची धडपड आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, आरक्षण केंद्र,उद्घोषणा ही सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.
-----------------------
रेल्वे सुरू होण्यासाठी खूप कमी दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. जेवढे शक्य होईल त्या सुविधा पुरविल्या जातील.
रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे