- राहुल शिंदे/ विशाल शिर्के पुणे : अस्वच्छ भटारखाने, पेस्ट कंट्रोलकडे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची आबाळ अनेक हॉटेल चालकांकडून केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. इतकेच काय, मिठाईसाठी वापरला जाणारा खवादेखील कमी दर्जा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. खव्यासारख्या नाशवंत पदार्थांची वाहतूक प्रवासी वाहनांतून अत्यंत खराब स्थितीत केली जात आहे.सोमवार पेठेतील शारदा स्वीट मार्टमध्ये सामोशाबरोबर दिलेल्या चिंचेच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची तक्रार एफडीएकडे करण्यात आली होती.नियमानुसार हॉटेल आस्थापनांमध्ये दर सहा महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करणे गरजेजे आहे. मात्र, सोमवार पेठेतील शारदा स्वीट मार्टने पेस्ट कंट्रोल केलेले नव्हते. तसेच, त्यांच्या परवान्याची मुदतदेखील संपली होती. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. हाच प्रकार शहरातील अनेक हॉटेल, मिठाईच्या दुकानांत दिसून येत आहे.हायजिन रेटिंगच्या गप्पा; पण खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचे काय? अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) हॉटेलना ‘हायजिन रेटिंग’ देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही महिन्यांपासून संकेतस्थळातील तांत्रिक त्रुटींमुळे आॅनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हायजिन रेटिंगचे काम पूर्णपणे थांबले आहे. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर शहरातील अधिकाधिक हॉटेल्सला रेटिंग दिले जाईल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. पण, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा काय करणार, याबाबत प्रश्न आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून हायजिन रेटिंग प्रमाणपत्र देण्यासाठी हॉटेलमधील अन्न तयार करण्याची जागा, अन्न तयार करण्यासाठी कच्चा माल कसा आणला जातो, तो कसा साठवून ठेवला जातो, अन्नपदार्थांची मुदत संपण्यापूर्वी ते वापरले जातात का, पिण्याच्या पाण्याची किती कालावधीमध्ये तपासणी केली जाते, हॉटेलमध्ये काम करणाºया कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी केली जाते का, हॉटेलमधील खरकटी भांडी कुठे ठेवली जातात, ती कोणत्या ठिकाणी स्वच्छ केली जातात, स्वच्छ केल्यानंतर भांडी कुठे ठेवली जातात, पेस्ट कंट्रोल वेळेत केले जाते का अशा अनेक गोष्टींची तपासणी केली जाते. पण, केवळ अर्ज करणाºया हॉटेलांचीच तपासणी होणार का? नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून एफडीएकडून स्वत:हून मोहीम सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.अस्वच्छता : ५ हॉटेलचा परवाना निलंबितकामगारांची स्वच्छता, भटारखान्याची स्वच्छता, कच्च्या खाद्यान्नाची अव्यवस्थित मांडणी, भटारखान्यात असलेली जाळीजळमटे, पेस्ट कंट्रोल या चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामे ७ हॉटेलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.येत्या २४ ते २९ सप्टेंबरदरम्यान ही हॉटेल बंद ठेवावी लागणार आहेत. हॉटेल कपिल रेस्टॉरंट-कात्रज, जयभवानी-धनकवडी, अंबिका-कात्रज, आर्किज बॉर्न बेकर्स-लुल्लानगर, विजयराज हॉटेल-सिटीपोस्ट, विघ्नहर रेस्टॉरंट-मंडई, हॉटेल गोकुळ अशी या हॉटेलवर एक ते ५ दिवसांपर्यंत परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.गुजराती खव्याच्या दर्जाबाबत साशंकताशहरातील व्यापाºयांना १३० ते दीडशे रुपये प्रतिकिलो दराने गुजराती खवा उपलब्ध होत आहे. या खव्यामध्येच रंग अथवा आंबा, संत्रा अशा चवीचे मिश्रण केले जात आहे. त्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. एफडीएचे सहायक आयुक्त शिंदे म्हणाले, की गुजरातहून येणारा खवा प्रवासी वाहनांमधून अत्यंत खराब स्थितीत येतो. येथे येण्यासाठी १८ ते २० तास लागतात. प्रवासी वाहनांमध्ये त्याची वाहतूक केल्यास गरमीमुळे त्यात जीवाणू निर्माण होण्याचा धोका वाढतो. नियमानुसार शीतकरणाची सुविधा असलेल्या वाहनातून खव्यासारख्या नाशिवांत पदार्थाची वाहतूक करणे बंधनकारक असते.खव्यामध्ये डालडा, खाद्यतेलाचे मिश्रणशहरातून जप्त करण्यात आलेल्या खव्यामध्ये स्कीम मिल्क पावडर, खाद्यतेल, डालडा, खाद्यरंग आणि मिल्क शुगरचे मिश्रण असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. संबंधित खवा हा बर्फी या नावाने विकला जातो. गोड असल्याने त्याचे थेट इतर मिठाईत मिश्रण करता येते, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आली.दीड-दोनशे रुपयांत खवा शक्यच नाही!पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे (कात्रज) कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी माहिती दिली. एक किलो खवा करण्यासाठी गाईचे ८ आणि म्हशीचे ७ लिटर दूध लागते. घाऊक प्रमाणात दूध खरेदी केल्यास व्यापाºयांना गाईचे ३० आणि म्हशीचे ४० रुपये प्रतिलिटरने दूध मिळते. त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च असतो. म्हणजेच ३०० रुपये प्रतिकिलो खाली खवा मिळणे शक्य होत नाही. नागरिकांनी स्वस्तात मिळतोय म्हणून अशा प्रकारचा खवा विकत घेऊ नये.आत्तापर्यंत काही महिन्यांपासून फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्स अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एफएसएसआय) संकेतस्थळावर हायजिन रेटिंगचा अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत. मात्र, आॅनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर त्वरीत १०० हॉटेलना हायजिन रेटिंग देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- संपत देशमुख,प्रभारी सहआयुक्त, एफडीए, पुणे
भटारखान्यातील ‘स्वच्छता’ दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 3:13 AM