'शरद पवारांना 'ईडी'च्या कार्यालयात जाण्याच्या सल्ला मीच दिला', नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:18 PM2021-12-02T19:18:12+5:302021-12-02T19:18:20+5:30
ईडीची भीती घालतात, पण आमच्यासमोर असलेली सीडी बाहेर काढली तर यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही, तुमच्यासोबत दोन हात करण्याची आमची तयारी आहे
पुणे : पुण्यात राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या तिन्ही पक्षाकडून जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी मलिक यांनी महाविकास आघाडी, भाजपवर टीका, शरद पवारांचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवारांना 'ईडी'च्या कार्यालयात जाण्याच्या सल्ला मीच दिला असल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.
मलिक म्हणाले, ईडीने पवारांना नोटीस पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एक बैठक आयोजित केली होती. याला तोंड कसं द्यायचं यावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी वकिलांना बोलवा असं सांगितले. पण मी तेव्हाच सांगितले होते की हा कायदेशीर लढाई नाही तर राजकीय लढाई नाही. तेव्हा शरद पवारांनी सांगितले की काय करायला पाहिजे. तेव्हा मीच त्यांना सांगितले की, ईडीच्या ऑफिसात जाणार असल्याची घोषणा करा. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली असल्याचे ते म्हणाले आहेत.
ईडीची भीती दाखवणाऱ्यांना आम्ही घाबरणार नाही
''माजी मुख्यमंत्री दोन पाऊल मागे गेले, हे इतकं सोपं नाही. म्हणजे काहीतरी नाही. हायड्रोजन बॉम्ब अजून फुटला नाही. मी तसाच शिल्लक ठेवला आहे. हे ईडीची भीती घालतात, पण आमच्यासमोर असलेली सीडी बाहेर काढली तर यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही, तुमच्यासोबत दोन हात करण्याची आमची तयारी आहे.''