पुणे : माझ्याकडे कोणी काम घेऊन आले तर मी तातडीने फोन लावत असतो, हे सर्वांना माहीत आहे; पण मी कधी व्हिडिओ चालू केला नाही, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांबाबत सोमवारी मुंबईत जाऊन शिवसेना तसेच काँग्रेसच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर आघाडीची भूमिका निश्चित करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचीच शिवसेना आहे आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मी काही वकिलांना विचारले, १६ जणांचा निकाल वेगळा लागला पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, असं आम्हाला वाटतं. आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू या.
आरे कारशेडच्या निर्णयाने खर्चात वाढ शिंदे सरकारने मुंबईतील मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडचा निर्णय बदलून पुन्हा आरे येथेच कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पवार म्हणाले की, आम्ही निर्णय घेतला तेव्हाच त्या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटी रुपयांनी वाढली होती.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या. उशीर झाला तर खर्चात आणखी १७ हजार कोटींनी वाढ होईल. तुमची भूमिका काहीही असली तरी जनतेच्या भल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, फायद्याचे आहे, त्याच्या बाजूने निर्णय झाला पाहिजे.