पुणे : मी शाळेमध्ये असताना हुशार विद्यार्थी नव्हतो, तर मी बॅक बेंचर होतो. सतत व्रात्यपणा करायचो, शाळेचे नियम मोडण्यात मी पुढे असायचो. परंतु, माझ्यातील कलागुण ओळखून माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला नाटकात काम करण्याचा सल्ला दिला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या अभिनयाची पाऊलवाट नूतन मराठी विद्यालय प्रशालेत ठरली, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
नू.म.वि. प्रशालेच्या ‘आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अर्थ सल्लागार आणि कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष मुकुंदराव अभ्यंकर यांना शनिवारी प्रदान केला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, प्रमुख पाहुणे गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, ‘आम्ही नूमवीय’चे अध्यक्ष अजित रावेतकर, कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, उपाध्यक्ष मोहन उचगावकर, सचिव मिलिंद शालगर, अभिषेक पापळ, मुख्याध्यापिका प्राची गुमास्ते, शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी मुकुंदराव अभ्यंकर यांच्या वतीने मिलिंद काळे यांनी पुरस्कार स्वीकारला, तर शरद काळे यांना मरणोत्तर जाहीर झालेला जीवनगौरव पुरस्कार यांच्या पत्नी सुनीती काळे यांनी स्वीकारला.
यंदा या पुरस्कारांचे तिसरे वर्ष आहे. यंदा नू. म. वि. रत्न पुरस्कार माधव ढेकणे, रवींद्र कुलकर्णी, रमाकांत परांजपे, प्रकाश भोंडे आणि ॲड. विजय सावंत यांना, तर नू. म. वि. भूषण पुरस्कार जगदीश आफळे, डॉ. अविनाश भोंडवे, मुकुंद संगोराम, मोहनकुमार भंडारी, प्रमोद फळणीकर आणि डॉ. अमित काळे यांना प्रदान करण्यात आला, तर यावेळी यशस्वी उदयोन्मुख तरुण नूमवीय पुरस्काराने गायक जसराज जोशी यांना देण्यात आला.
डॉ. आगाशे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील गुण अचूकपणे ओळखण्यात नू.म.वि.चे शिक्षक पारंगत होते. अनेक विद्यार्थी हा पुरस्कार स्वीकारण्यास माझ्यापेक्षा जास्त पात्र आहेत, याची मला जाणीव आहे. आज मला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार मी प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारत आहे. प्रास्ताविक अजित रावेतकर यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
''शाळेला आईची उपमा दिलेली असते. आईकडून मिळालेला हा पुरस्कार असला तरी त्यात कृतज्ञतेचाच भाव अधिक आहे. जसे हजारो वर्षांचा अंधकार एका मेणबत्तीने क्षणार्धात घालवता येतो, तसेच नू.म.वि.चे विद्यार्थी समाजातील अंधकार घालवून प्रबोधनाचे काम करतील, अशी मला आशा आहे. - डॉ. अजित रानडे, कुलगुरू गाेखले इन्स्टिट्यूट''