पुणे - आव्हानं तर सगळ्यांसमोर येत असतात पण काहीवेळा माणूसही हतबल होईल अशी वेळ येते आणि एखाद्याच्या रूपाने जणू देवदूत येऊन मदत करतो. पुण्यात राहणाऱ्या स्वामिनाथन कृष्णमूर्ती यांनाही असाच अनुभव आला होता आणि त्यावेळी त्यांच्यासाठी देवदूत ठरल्या त्या 'सुषमा स्वराज'. स्वामिनाथन यांचे परदेशात अपहरण झाल्यावर त्यांना मायदेशापर्यंत सुखरूप आणण्यात स्वराज यांचा सिंहाचा वाटा होता. स्वराज यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांना अश्रू अनावर झाले होते.
ही घटना आहे जून २०१४ ची. स्वामिनाथन हे नोकरीच्या निमित्ताने नायजेरिया या देशात गेले. नवीन देश, नवी माणसे, तिथल्या चालीरीती समजण्याच्या आतच त्यांचे अपहरण झाले. त्यांच्याकडे तब्बल १० मिलियन एवढ्या नायजेरियन चलनाची (भारतातील ३७ लाख रुपये) मागणी करण्यात आली. त्याच काळात पुण्यात राहणारा त्यांचा मुलगा अमित हा त्यांना संपर्क करत होता. मात्र वारंवार त्याला न समजणाऱ्या भाषेत उत्तर मिळत होते. अखेर खुद्द स्वामिनाथन यांनी फोन उचलला आणि या प्रकाराची माहिती दिली. अचानक एवढ्या पैशांची सोय कशी करायची असा प्रश्न कटुंबासमोर होता. त्यातच अपहरण नायजेरियात आणि कुटूंब भारतात अशी स्थिती होती. या प्रकारात दोन दिवस उलटून गेले होते. अखेर त्यांचा मुलगा अमित यांनी तत्कालीन पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ दखल घेत तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला. स्वराज त्यावेळी जपानच्या दौऱ्यावर होत्या. पण त्याही वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत मदतीचे आश्वासन दिले आणि एकच धावपळ सुरु झाली. पुढचे ४८तास भारतीय परराष्ट्र खाते नायजेरियाच्या सरकारशी संपर्कात होते. स्वतः स्वराज या वेळोवेळी माहिती घेत होत्या. स्वामिनाथन नोकरी करत असलेल्या कंपनीशीही परराष्ट्र खात्याने संपर्क केला. त्यांनी गंभीर दखल घेतली नाही तर संबंधित कंपनीला भारतातून हद्दपार करू असेही सांगण्यात आले. शेवटी दबाव कामी आला आणि काही तासात त्यांची सुटका झाली आणि इथेच या प्रकरणाचा दुसरा अंक सुरु झाला.
यांची अपहरणकर्त्यांपासून सुटका तर झाली होती पण त्यांनी नोकरी पत्करलेल्या कंपनीने त्यांना भारतात परत पाठवण्यास नकार दिला.सुमारे महिनाभर त्यांचे प्रयत्न सुरु होते. इकडे भारतात त्यांचे कुटुंब प्रचंड चिंतेत होते. स्वतः स्वामिनाथन परत येऊ इच्छित असताना त्यांचा पासपोर्ट कंपनी देत नव्हती. शेवटी त्यांनी पुन्हा शिरोळे आणि स्वराज यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या मध्यस्तीने ते पुन्हा भारतात येऊ शकले. आज ते पुण्यात वास्तव्य करत असून स्वराज यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांना अश्रू आवरत नव्हते. या घटनेबाबत ते सांगतात, 'सगळीकडे अंधार दाटलेला असताना अचानक प्रकाशाचा झोत येतो आणि वातावरण उजळवून टाकतो, त्याचप्रमाणे स्वराज आणि त्यांच्या प्रशासनाने माझे आयुष्य वाचवले. त्या होत्या म्हणून मी आज जगू शकलो. माझे कुटुंब कायम यांच्या ऋणात असेल. त्यांच्या जाण्याने आपल्या देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे'. असे मला वाटते.