पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. विरोधकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यावरून रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा लढवण्यास तयार आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पाटील म्हणाल्या, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता येणाऱ्या काही दिवसात चित्र तुमच्यासमोर येईल. काँग्रेसने त्यांचे उमेदवार लढवणार असल्याचं सांगितलं आहे. तिन्ही पक्षाकडून उमेदवार इच्छुक आहेत. पण येणाऱ्या काळात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची प्रक्रिया करू. कसबा मतदार संघाचे मतदार हे विकास करणाऱ्या, सुखसुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीकडे बघूनच मतदान करतात. पूर्वीपासून काँग्रेस लढवत होते म्हणून तेच लढवतील किंवा भाजप दरवेळी निवडून येतात. म्हणून यंदाही तेच निवडून येतील असं होणार नाही. येणाऱ्या काळात कळेल कि, उमेदावर कोण असणार आहे. कसबा निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा ही पोटनिवडणूक लढण्यास तयार आहे. तस मी वरिष्ठांना निवेदन दिले आहे.
काय आहेत शक्यता?
-- निवडणूक बिनविरोध- मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास सहानुभूती म्हणून महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्ष उमेदवारच देणार नाहीत.
-- अन्यायाची भरपाई- मागील विधानसभा निवडणुकीत मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकात पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. सिटिंग आमदार असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली. त्या अन्यायाची भरपाई म्हणून यावेळी इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.
- इच्छुकांना संधी- कोथरूड मतदारसंघातून भाजपमध्येच बरेच इच्छुक आहेत. खासदार व या मतदारसंघाचे माजी आमदार, पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.
-- विरोधकांचे इच्छुक - यात मागील वेळचे काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांचा समावेश आहे.
कसबा मतदारसंघ (मतदार)
एकूण : २ लाख ७५ हजार ४२८
पुरुष : १ लाख ३६ हजार ८७३
महिला : १ लाख ३८ हजार ५५०
तृतीयपंथी : ५