लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अर्थमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार आहेच. पालकमंत्रिपदाचा कसलाही वाद नाही, पुण्यातील ध्वजवंदन राज्यपालच करत असतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींवरच संतापले. राज्य सरकारनेच पत्रक काढून पुण्याचे ध्वजवंदन पालकमंत्री चंद्रकात पाटील करणार, असे जाहीर केल्याचे सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
पुण्यातील विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, ते आता कोणाकडे आहेत कसे समजायचे, या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम स्थापन केली आहे. या वॉर रूममध्ये मुख्यमंत्री नसताना अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावरही मुख्यमंत्रिपदावर डोळा, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानेही पवार यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मुर्ख आहोत का,’ असा सवाल करीत ‘मुख्यमंत्र्यांत आणि माझ्यात कोणताही वाद नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
मीही अर्थमंत्री आहे. बैठका घेण्याचा, माहिती घेण्याचा अधिकार मलाही आहे. त्यामुळे मी बैठका घेतो. मात्र, काही निर्णय वगैरे गोष्टी असतील तर मुख्यमंत्र्यांचाच शब्द अंतिम असतो. त्यामुळे ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे, यात तथ्य नाही असे ते म्हणाले.
ध्वजवंदनाच्या निर्णयावर संतापले
स्वातंत्र्य दिनी पुण्यात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार, असे पत्रक सरकारकडून जाहीर केले होते. त्यामुळे पालकमंत्री पाटीलच अशा बातम्या आल्या होत्या. त्यावरही पवार यांनी संताप व्यक्त केला. मागील अनेक वर्षांची पुण्यात प्रथा आहे की, स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन राज्यपाल करतात. त्यामुळे पालकमंत्री कोण, असा प्रश्न आला कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. सरकारचेच तसे पत्रक होते, याकडे लक्ष वेधले असता त्यावर ते काहीच बोलले नाहीत.