पुणे : ‘मी मुख्यमंत्र्यांचा पीए बाेलताेय.... ससूनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरक्यू मेस बंद करा आणि तातडीने दुसरे टेंडर प्रक्रिया करा’ असा आदेशवजा फाेन लँडलाईनवरून ससूनच्या अधिष्ठाता यांना आला आणि सर्वांची एकच पळापळ झाली; मात्र संशय आल्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुन्हा खात्री केल्याने हा फेक काॅल असल्याचे कळाले. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता कक्षात सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.
या भामट्याने अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याबराेबर पाच ते सहा मिनिटे संभाषण केले. त्यामध्ये त्याने ससूनमध्ये किती मेस आहेत याची माहिती घेत तातडीने मेस बंद करण्याचे व नव्याने कंत्राट देण्याचे फर्मावले. यावर अधिष्ठाता यांनी विद्यार्थी व मार्ड डाॅक्टरांची गैरसाेय हाेईल असे सांगितले; परंतु त्याने या मेस बदलण्याचा आग्रह धरला. औषधांबाबतही चाैकशी केली. यावर अधिष्ठाता यांनी गाेरगरिबांना औषधे बाहेरून आणावी लागू नये यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सांगितले.
याबाबत ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना विचारले असता त्यांनी फेक कॉल आल्याचे सांगत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. अशा प्रकरणात वेळ वाया घालवण्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.