आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवसच उरले असून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
निवडणुकीदरम्यान कायम चर्चेत असलेल्या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी बारामतीची ओळख शरद पवारांमुळे आहे, असं विधान केलं आहे.
मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. मला वाटलं आपण शरद पवारांसाठी काहीतरी केले पाहिजे आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे आहे, असं युगेंद्र पवार यांनी सांगितले. युगेंद्र पवारच्या या विधानावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतात याचा मला आनंद आहे. पवार कुटुंबातील लोकांना ज्यांना प्रचार करायचा आहे आहे ते करतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांचे जुने सहकारी काम करीत आहे- सुप्रिया सुळे
गेली ५५ वर्षें राज्यात कुणी ही नेता आला तरी शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. लोकसभाजवळ आली आहे, त्यामुळे सगळे कामाला लागले आहेत. त्यामध्ये आम्हीही प्रचार करीत आहोत. बारामतीत शरद पवारांचे जुने सहकारी काम करीत आहेत. काल आमच्यावर घराणेशाहीची टीका करण्यात आली. आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करायचे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.