सांगवी (बारामती) :माझ्याकडे खूप जणांचे पैसे आहेत.त्यांचे फोन आल्यावर मला भीती वाटते मी कर्जबाजारी झालोय माझ्या पाच मुलींची लग्न लाऊन द्या अशी चिट्ठी लिहून ३५ वर्षीय विवाहित तरुणाने नैराश्यतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.
माळेगाव (ता.बारामती) येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख, (वय ३५), रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी) माळेगाव बु.(ता. बारामती जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शाहरुख गुलाबफकिर इनामदार (वय २०),रा. साठेनगर (पिरबाबा दर्गा शेजारी )माळेगाव बु. (ता. बारामती जि.पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
शुक्रवारी (दि.२३)रोजी पहाटे साडे सहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येनंतर बारामती येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले होते. माळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महम्मद हसन शेख हे मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना पाचही मुली होत्या, त्यांच्यावर कर्ज झाल्याने त्यांनी नैराश्यतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येनंतर पोलिसांना मयत शेख यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. मला खूप जणांचे पैसे मागण्यासाठी फोन येतात. यामुळे मला त्यांची भीती वाटते, माझ्या पाचही मुलींची लग्न लाऊन द्या असे आत्महत्या करते वेळी चिठ्ठीत हिंदी भाषेत लिहिल्याचे समोर आले आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.