मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार, उपोषणाला करायला मोकळा - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:11 IST2025-04-11T09:10:26+5:302025-04-11T09:11:27+5:30
महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर छगन भुजबळ यांनी साधला संवाद

मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार, उपोषणाला करायला मोकळा - छगन भुजबळ
पुणे : महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पण जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवाटोलवी करत आहे. मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या, तर थोडीशी अडचण होते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, महात्मा फुलेवाडा वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे. तेव्हा आणि त्यापूर्वीपासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. हे १०० ते २०० कोटींचे काम आहे.
यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करूनदेखील प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीदेखील सकारात्मक आहेत. सरकारमध्ये असतानादेखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलनात का करावं लागतं असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, या गोष्टी सरकारला विचारायला हवं या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री यांना विचारायला हवा की या गोष्टीसाठी आंदोलन का ? करावा लागत आहे.
महात्मा फुले यांच्यावरील हिंदी चित्रपटाला कोणीही विरोध करू नये
महात्मा फुले यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे. महात्मा फुले यांच्याबाबत मराठीमध्ये चित्रपट आले असले तरी पहिला हा हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाला सेसॉरनेदेखील परवानगी दिली आहे. हे खरं आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणाने काही गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे इतिहास हा इतिहास म्हणून समोर आला पाहिजे. महात्मा फुले यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो आहे. याचा मला आनंद आहे. त्यामुळे मला वाटतं कोणीही विरोध करू नये, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
दोन्ही नेते मला आदरस्थानी
माझं भाग्य आहे की २५ ते २७ वर्षे मला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा नेता मिळाला. म्हटलं तर मी त्यांचा उजवा हात होतो. मला त्यांच्याजवळ राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत. या दोघांपासून आम्ही शिकलो. हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.