पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते पुण्यातून लोकसभा लढविणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाणेर येथील कार्यक्रमात ऑनलाइन बोलताना गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकर बनावे, असे म्हटले.
यावर फडणवीस म्हणाले, स्वभावाने आणि जन्माने मी नागपूरकर आहे. कर्माने मुंबईकर आहे. विशेष म्हणजे प्रेमाने मी पुणेकर आहे. पुण्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि माझेही पुण्यावर प्रेम आहे. पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. भविष्यातील शहर असून, नॉलेज सिटी आहे. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचवेळी आयटीची राजधानी पुणे आहे.
महाराष्ट्र हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. त्यात देशात वीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा मुबलक असल्या पाहिजे. पुण्यात अनेक प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजनासाठी यायचे म्हटले तर वर्षातून शंभर दिवस मला पुण्यात यावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस हे गेल्या ९ वर्षांत नागपूरपाठोपाठ सर्वाधिक वेळा पुण्यात आले आहेत. त्यात आता पुण्यात लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या तोडीचा उमेदवार नसल्याची भाजपमध्ये चर्चा सुरू असताना फडणवीस यांच्या या पुणे प्रेमाने ही चर्चा अधिकच सुरू झाली आहे.