वारजे (पुणे): निवडणुकीनंतर सत्ता कोणाची येईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. पण निवडणुका होताच पेट्रोलियम पदार्थच्या किंमती मात्र नक्की वाढणार आहेत. असे मत माजी कृषी मंत्री शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केले.
वारजे येथील पुणे मनपाने केलेल्या कै. सुभद्रा बराटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात उद्या पंतप्रधान येणार असून ते देशाचे आहेत व त्यांचे स्वागत करायलाच हवे. पुण्यातील अर्धवट प्रकल्पाचे ते उदघाटन करणार आहेत, असा टोलाही पवार यांनी लावला.
तसेच नवाब मलिक (nawab malik) यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नावर मागे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना देखील अटक झाली होती. ते तर भाजपचे केंद्रीय मंत्री होते त्यांचा राजीनामा घेतल्याचे मी तरी पाहिले नाही त्यामुळे मलिकांचा राजीनाम्याची शक्यता त्यांनी फेटाळली. तसेच मलिक हे मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडण्यात येतो हे अनाकलनीय आहे. तसेच केंद्राची पातळी नेहमीपेक्षा जास्त खालावली आहे. याचा प्रत्यय राज्यपालांच्या वर्तणुकीतून दिसतो असतो, असे पवार म्हणाले.
कार्यक्रमास महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, हॉस्पिटलचे निर्माते नगरसेवक दिलीप बराटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, अभुद्य बराटे, कुमार गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते.