दौंड : दौंड येथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांबरोबर घातलेली हुज्जत एका युवकाच्या अंगलट आली असून त्याला अखेर जेलची हवा खावी लागली आहे. अवधूत ज्ञानदेव राऊत (वय ३१, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता गुरुवार ( दि.१० ) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय घोडके यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ( दि. ८ ) रोजी सायंकाळच्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करीत होते. यावेळेस अवधूत राऊत हा तरुण चारचाकी गाडीतून येत होता. यावेळी कानाला मोबाईल लावून तो गाडी चालवत होता. दरम्यान त्याची गाडी चौकात आल्यानंतर पोलिसांनी अडवली. तू आणि तुझ्या मित्राने मास्क का लावला नाही अशी पोलिसांनी विचारणा करून गाडीचे कागदपत्र मागितले.
'मी माझ्या गाडीत बसलो आहे मला मास्क लावण्याची आवश्यकता नाही', असे सांगत तरुण गाडीतुन खाली उतरून पोलिसांच्या अंगावर धावून गेला. त्याने धक्काबुक्की करून पोलिसांना एकेरी भाषेचा वापर करत हुज्जत घातली. पोलिसांना शिवीगाळ केली. शेवटी पोलिसांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याला जेलची हवा दाखवत त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे तपास करीत आहे.