पुणे : मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृस्थ आहे, असे मत वंचित विकास बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांनी आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांच्याबरोबर जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मी तर राजकारणातला अस्पृश्य आहे. मी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर जायला तयार आहे. मात्र ते मला भाजपाकडे ढकलतात. ज्याला मी तयार नाही. मी संभाजी राजेंबरोबर जाण्यास तयार आहे.शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. बहुजनांमधील जिव्हाळ्याचे संबंध वाढू द्यावा हा या भेटीमागे दृष्टिकोन असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले होते. संभाजी राजेंनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातील राजकारणात आलेला शिळेपणा दूर होऊन ताजेपणा येईल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. त्यावर अधिक स्पष्ट कराल का असे विचारल्यावर त्यांनी २ जूनला त्याबाबत अधिक स्पष्टपणे सांगणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे आता संभाजी राजे आणि अॅड. आंबेडकर एकत्र येणार का यावर चर्चा सुरु झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजे यांना भाजपने खासदार केले, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्याविषयी विचारता, संभाजी राजे म्हणाले, भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातील खासदारपद दिले, हे आपण कधी नाकारत नाही, असे उत्तर दिले.